अर्थसाक्षर.कॉम चालू झाल्यापासून गुंतवणूक, कर, कर्ज हे विषय सोडून इतरही अनेक समस्या आमच्या वाचकांनी आमच्यासमोर मांडल्या. त्यांच्या समस्यांचे निराकरण करायचा शक्य तितका प्रयत्न आम्ही केला. पण आमच्यासमोर आलेल्या काही समस्या वाचून आमचेही मन हेलावून गेले आणि या विषयावर लेखमाला लिहिणे आवश्यक आहे हे आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे आजपासून संपत्ती आणि नातेसंबंध, आरोग्य समस्या अशा विविध वैयक्तिक विषयांवर दर शनिवारी कथास्वरूपात लेख प्रकाशित केला जाईल. यामध्ये आमच्यासमोर आलेल्या काही समस्या आम्ही कथारूपाने इथे मांडायचा आम्ही प्रयत्न करू. समस्या वैयक्तिक असल्या, तरी थोडयाफार फरकाने आपल्या आसपास असं एखादं तरी उदाहरण नक्की सापडेल.
- अर्थ म्हणजे पैसा. पण अर्थसाक्षरता म्हणजे निव्वळ गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन नव्हे तर, अर्थसाक्षरता म्हणजे परिस्थितीनुसार पैशाचे मूल्य समजून घेणे.
- इथे परिस्थिती म्हणजे केवळ जागतिक मंदी, बाजारातला चढ-उतार नव्हे तर, तुमच्या समोर असणारी भावनिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे उद्भवणारी परिस्थिती.
- जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. लक्षात ठेवा पैसा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पण आजच्या काळात “पैसा झाला मोठा” अशी परिस्थिती आहे.
- प्रत्येकजण आपल्या स्वप्नांमागे धावण्यात व्यस्त आहे. कोणालाच कोणाची पडलेली नाही अशी परिस्थिती आहे. अगदी आई, वडील, भावंडं, मुलं, नातवंड यांच्यापेक्षाही पैसा जास्त जवळचा वाटू लागला आहे. हे खरंच योग्य आहे का? थोडं थांबा! काही क्षण विचार करा. आपण कुठे चाललो आहोत, हे तुमचं तुम्हालाच कळेल काहीतरी चुकतंय जे सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे.
- तुमच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तुमचा अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी, तुमच्या जीवलगांप्रती तुमची काही कर्तव्यही आहेत हे विसरून कसं चालेल?
आजची कथा अशाच एका जीवलगांप्रती आपलं कर्तव्य विसरलेल्या समीरची आणि त्यामुळे दुखावलेल्या त्याच्या आईची आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन
सुमतीबाई एक रिटायर्ड शिक्षिका. आयुष्यभर मध्यमवर्गीय आयुष्य जगल्यावर उतारवयात मात्र बंगल्यात राहायचं भाग्य त्यांच्या नशिबी आलं, तरी समाधानी मानसिकता काही बदलली नाही. जे आहे त्यामध्ये समाधान मानायचं, प्रामाणिकपणे आपलं काम करायचं आणि अडल्या नडल्याला मदत करायची, अशी साधी सरळ विचारसरणी असणाऱ्या सुमतीबाई आजकाल मात्र खूपच उदास रहात असत. त्याला कारणही तसंच होतं. ते म्हणजे हातात नसणारा हक्काचा पैसा.
समीर त्यांचा एकुलता एक मुलगा. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी हिमतीने त्याला वाढवलं. तो इंजिनिअर झाल्यावर त्याला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करायचा होता. त्यामुळे सुमतीबाईंनी निवृत्तीच्यावेळी मिळालेला सगळा पैसा समीरला दिला. हुशार समीरने भरपूर मेहनत करून व्यवसायातही उत्तम जम बसविला आणि सगळे कुटुंब चार खोलींच्या फ्लॅटमधून प्रशस्त बंगल्यात रहायला गेले. यथावकाश समीरचं लग्न झालं. त्याची पत्नीही सुस्वभावी आणि समंजस होती. हळूहळू समीरचा संसार वाढू लागला आणि घरात एक चिमुकला जीव बागडू लागला. सगळ्या बाजुंनी सुख सुमतीबाईंसमोर हात जोडून उभं होतं.
निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या…
हळूहळू समीरची मुलं मोठी व्हायला लागल्यावर त्याच्या संसारात त्याला आईची गरजही फारशी उरली नाही. पुढे काही कारणांनी सुमतीबाईंच्या भावाच्या मुलाला म्हणजेच समीरच्या मामेभावला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. उपचारासाठी लाखो रुपये खर्च होत होते. सर्व नातेवाईक जमेल तशी मदत करत होते. समीरच्या आईने समीरला मामाला आर्थिक मदत करायला सांगितले पण समीरने मात्र स्पष्ट नकार दिला. त्याचा नकार सुमतीबाईंना अनपेक्षित आणि धक्कादायक होता. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी आपल्या पेन्शनच्या पैशातून आपल्या भावाला थोडीफार मदत केली आणि यावरून माय लेकरांमध्ये वाद झाला. आज आपल्या हक्काचे पैसे आपल्याजवळ असते तर, आपण आपल्या भावाला मदत करू शकलो असतो. ही भावना मनात निर्माण झाली आणि आई मुलामधले भावनिक अंतर वाढत गेले.
मनातले अंतर वाढत गेले की नाती तुटायला वेळ लागत नाही. इथेही तसंच झालं. आपल्या निवृत्तीपश्चात आयुष्याचा आनंद घेत असताना अचानकपणे आलेल्या या प्रसंगामुळे त्यांना आपल्या मुलाची अति प्रॅक्टिकल विचारसरणी, अति महत्वाकांक्षी स्वभाव या गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या. पैशाच्या धुंदीत वावरताना इतर नाती त्याच्या दृष्टीने महत्वाची नव्हती.आणि हीच गोष्ट सुमतीबाईंना अस्वस्थ करत होती. आईच्या प्रेमाची किंमत तो पैशात करत होता. तो फक्त आपलं कर्तव्य पार पाडत होता. त्यात कुठेच मायेचा ओलावा नव्हता.
ज्या भावाने पतीच्या निधनानंतर त्यांना खंबीर आधार दिला, आज त्याला गरज असताना आपण फारशी मदत करू शकत नाही, याचे शल्य सुमतीबाईंच्या मनाला अस्वस्थ करत होते. अखेर त्यांनी समीरला व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. पैसे मागितल्यावर पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. आपल्या भावाला मदत करण्यासाठी आपल्या मुलाला दुखावलं, या भावनेने सुमतीबाई पुन्हा अस्वस्थ झाल्या. उद्या आपल्याला काही झालं तर, आपला मुलगाच आपल्याला बघणार, त्यामुळे त्याला दुखावून आपण अगदीच एकटे पडलो आहोत. या विचाराने त्या अजून दुःखी झाल्या.
वरील कथेमध्ये शेवट गोड करण्यासाठी समीर सुधारलेला दाखवता येईलही पण प्रत्यक्ष आयुष्यात असं घडेलच असं नाही. “निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन” हा या कथेचा मुख्य भाग आहे.
निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन
- तुमच्या मुलांना तुम्ही मदत जरूर करा. करायलाच हवी. मुलांना आईवडील मदत करणार नाहीत, तर कोण करणार? पण आपल्या हयातीत आपला सर्व पैसा मुलांच्या हाती देऊ नका. अगदीच आवश्यक असेल तर, कागदोपत्री करार करा आणि मग द्या. या कथेमधला मुलगा तसा वाईट नव्हता फक्त थोडा जास्त प्रॅक्टिकल आणि पैसाप्रेमी होता. पण प्रत्येकवेळी असे असेलच असं नाही कदाचित एखाद्याची अवस्था बागबान चित्रपटातल्या अमिताभसारखी होऊ शकते.
- पैसा ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे अनेक नाती तुटू शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये पैशाचे व्यवहार शक्यतो करू नका. अगदीच गरज असेल, तर जवळच्या व्यक्तीकडून मदत घ्या किंवा मदत करा, पण मदत करताना समोरच्याकडून परतफेडीची आशा ठेवू नका आणि घेताना परतफेडीची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा.
निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे भाग १
मुलांना मदत करताना कोणती काळजी घ्याल?
- तुमच्या निवृत्तीनंतर मिळणारा पैसा, म्हणजे तुमची आयुष्यभराची कमाई असते. त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करून त्याचे योग्य ते नियोजन करा.
- अर्थसाक्षरने यासंदर्भात विविध लेख प्रसिद्ध केले आहेत ते वाचून निवृत्तीनियोजन करा अथवा चांगल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.
- मुलांना मदत जरूर करा. पण ती करताना इच्छा आणि गरज या दोन्ही गोष्टी समजून घ्या आणि मगच मदत करा.
- कृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केलं पण लढाई मात्र अर्जुनालाच लढावी लागली. त्याचप्रमाणे मुलांना योग्य मार्गदर्शन करा त्यांना मदतही करा, पण त्यांची लढाई त्यांनाच लढू द्या. तरच त्यांचं आयुष्य जगायला ती सक्षम बनतील.
मृत्युपत्र म्हणजे काय?
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/