Reading Time: 4 minutes

“अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

मेधा तशी निरागस मुलगी. जेमतेम ग्रॅज्युएट झाली आणि तिचं लग्न झालं. खरंतर मेधाचा प्रेमविवाह. मग ठरलेलं लग्न ठेवायचं कशाला? असा विचार करून ग्रॅज्युएट होताच तिचं लग्न झालं. माहेर सासर दोन्हीकडची माणसं तशी समंजस. मेधाचा नवरा आकाश सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि एका नामांकित कंपनीमध्ये  चांगल्या पगाराची नोकरी करत होता. मेधाची नणंद आर्किटेक्चर कॉलेजला होती. सासू कॉलेजमध्ये प्रोफेसर, तर सासरे क्लास वन ऑफिसर. अशा उचचशिक्षित कुटुंबात मेधाच्या मनात स्वतःबद्दल काहीसा न्यूनगंड उत्पन्न झाला.

फसव्या योजना कशा ओळखाल?

लग्नानंतर मेधाने पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार बोलून दाखवला. तिच्या सासरी या निर्णयाचे स्वागतच झाले. सासूने सगळी जबाबदारी घेतली आणि मेधा कॉलेजला जायला लागली. मेधा तशी फार हुशार नव्हती. पण उच्चशिक्षित कुटुंबात आपणही आपलं स्थान निर्माण करावं, अशी सुप्त इच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे ती जोमाने अभ्यास करत होती. यथावकाश मेधाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिच्या पास होण्याची आणि घरात नवीन पाहुणा येण्याची बातमी एकाच दिवशी मिळाली आणि मेधाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सोनोग्राफीमध्ये जुळी बाळं असल्याचं कळलं आणि मेधाला पुन्हा टेन्शन आलं. पण तिला धीर देत सासूने डिलिव्हरीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेईन असं जाहीर केलं. 

सगळं सुरळीत चालू  होतं. यथावकाश मेधाची डिलिव्हरी झाली. सासूनेही सेवानिवृत्ती घेतली. दोन्ही बाळाच्या संगोपनात मेधाचा दिवस कधी संपे ते तिचं तिलाही कळत नसे. बघता बघता तीन वर्ष संपली. शहरातल्या नामांकित शाळेमध्ये मेधाच्या मुलांना डमिशन मिळाली. याच दरम्यान मेधाच्या नणंदेने आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स पूर्ण केलं आणि तिला एका चांगल्या फर्ममध्ये नोकरी मिळाली. 

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

मुलांच्या शाळेमुळे मेधाच्या ओळखी वाढू लागल्या. तिच्या मुलांच्या शाळेतील बहुतांश मुलांचे पालक उच्चशिक्षित व आपआपल्या करियरमध्ये यशस्वी होते. त्यातील बहुतांश माता उत्तम पगाराची नोकरी करत होत्या. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या आपल्या नणंदेला, आपल्या मैत्रिणींना मिळणारा पगार व स्टेटस, सासूची पाच आकडी पेन्शन हे सारं पाहून मेधाच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला आणि तिच्या मनात नोकरी करण्याचा विचार घोळू लागला. तिच्या या इच्छेलाही कोणी नकार दिला नाही. ती एका कोचिंग क्लासमध्ये नोकरी करू लागली. दोन मुलांना सासूच्या ताब्यात देऊन मेधा स्वतःचा इगो सुखावण्यासाठी एक अशी नोकरी करत होती ज्यामध्ये ना फारसा पगार होता, ना भविष्य!

घरात काहीच खर्च करावा लागत नसल्यामुळे मेधाचा बँक बॅलन्स हळूहळू वाढत गेला.  ती स्वतःला “सक्सेसफुल वर्किंग वुमन” समजू लागली होती. अशातच तिच्या ऑफिसमधल्या एका सहकारी मैत्रिणीने एका झटपट श्रीमंत करणाऱ्या योजनेबद्दल सांगितले. मेधा हुरळून गेली. तिने सहकारी मैत्रिणीकडून आवश्यक ती माहिती घेऊन त्वरित त्या संबधीत योजना सांगणाऱ्या व्यक्तीला गाठले. 

‘त्या’ व्यक्तीने आत्मविश्वासाने सर्व योजना मेधाला समजावून सांगितल्या. ती भारावून गेली. सुरुवातीला फक्त काही रक्कम गुंतवायची असा विचार करणाऱ्या तिने चक्क २५०००/- रुपये दोन महिन्यांसाठी गुंतवले. दोन महिन्यानंतर तिला ३००००/- रुपये मिळाले आणि ती अजून भारावली. मिळालेल्या ३००००/- रुपयांमध्ये २००००/- रुपयांची भर घालून ५००००/- रुपये ६ महिन्यांसाठी गुंतवले. याशिवाय अनेक नातेवाईकांना या योजनेबद्दल सांगितले. तिच्या अनेक नातेवाईकांनी तिच्या जवळ पैसे गुंतवायला दिले. परंतु, तिच्या सासऱ्यांनी मात्र तिला एकही पैसा दिला नाही. उलट चार शब्द समजावून सांगितले. 

सासाऱ्यांच्या नकारामुळे मेधाचा इगो दुखावला गेला होता. तिने मागचा पुढचा विचार न करता आपले होते नव्हते ते सर्व पैसे या योजनेत गुंतवले. दोन महिन्यानंतर मात्र मेधाच्या काही नातेवाईकांचे पैसे परत मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी तिच्याकडे या संदर्भात विचारणा केली. मेधाने त्वरित त्या व्यक्तीला फोन लावला तर फोन बंद. तिच्या सहकारी मैत्रिणीला विचारले असता तिने, “त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही”, असं सांगून हात वरती केले. एकीकडे मेधाकडे गुंतवणूक करायला देणारे सगळेजण पैसे तिच्यामागे पैशासाठी तगादा लावत होते, तर दुसरीकडे अनेकदा फोन लावूनही त्या व्यक्तीचा फोन काही लागत नव्हता किंवा त्याच्याशी संपर्क करायचा कुठलाही पर्याय सापडत नव्हता. पोलीस तक्रार करायची, तर कशाच्या आधारे करणार? ना कुठली कागदपत्रे, ना पावती, ना इतर कुठला पुरावा.  

श्रीमंत मी होणार!

काही दिवसांतच मेधाच्या सासूच्या कानावर हा सगळा प्रकार आला. मेधा संकटात होती. त्यामुळे आत्ता बाकी काही बोलण्यापेक्षा तिला या संकटातून सांभाळणं आवश्यक आहे, असा विचार करून तिच्या सासू- सासाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन सगळा प्रकार विचारला. हतबल मेधाने सुरुवातीपासूनचा सगळं प्रकार त्यांना सांगितला. तिचे सासरे नुकतेच निवृत्त झाले होते.  त्यांना निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतुन त्यांनी बाकीच्यांचे पैसे परत केले. त्यांनतर मात्र मेधाबद्दल त्यांच्या मनात अढी निर्माण झाली. त्यांनी तिच्याशी बोलणंच टाकलं. जी काय थोडीफार रक्कम उरली होती ती त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर करून टाकली. निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून त्यांना बरीच स्वप्न पूर्ण करायची होती. पण त्यांच्या सुनेच्या एका चुकीमुळे त्यांची आयुष्यभराची अर्धीअधिक कमाई नाहक खर्च झाली होती.

मेधाचे काय चुकले?

  • मेधाची सर्वात मोठी चूक म्हणजे तिने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला. ती दिखाऊपणाला भाळली.
  • तिचे सासरे तिला सावध करत होते, तरीही तिने त्यांचे ऐकले नाही.
  • या योजनेसाठीचे सर्व व्यवहार करताना रोख रक्कम तिने दिली. त्यामुळे तिच्याकडे कुठलाही पुरावा राहिला नाही. 
  • स्वतःहून बाकीच्यांच्या पैशाच्या गुंतवणुकीची जबाबदारी घेतली. ती न घेता संबंधित व्यक्तीला भेटायचा सल्ला ती देऊ शकली असती. यामुळे निदान लाखो रुपयांचे नुकसान ती टाळू शकली असती. 

कोणती काळजी घ्याल?

  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झटपट श्रीमंत करून देणारी कोणतीही योजना जगात अस्तित्वात नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यामुळे अशी कोणती योजना जर का कोणी तुम्हाला सांगत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका.
  • गुंतवणूक करताना शक्यतो नामांकित खाजगी कंपन्या किंवा सरकारी योजनांमध्येच करा. आवश्यकता वाटल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. 
  • गुंतवणूक करताना रोख रक्कम देणे शक्यतो टाळा. सर्व व्यवहार चेक किंवा नेट बँकिंगनेच करा. यामुळे तुमच्याजवळ व्यवहाराचे सर्व पुरावे तर राहतीलच, शिवाय ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा होतील, त्या व्यक्तीच्या बँक खात्यामधील सर्व माहिती तपासून पोलिसांना संबंधित व्यक्तीला शोधणेही सोपे जाईल. 
  • कितीही जवळची व्यक्ती असली तरी त्या व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची जबाबदारी तुम्ही घेऊ नका किंवा कोणालाही आपल्या गुंतवणुकीची जबाबदारी देऊ नका. 

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

सबसे बडा रुपया” हे जरी खरं असलं, तरी पैसा हेच सर्वस्व नाही. पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या आपल्या जीवलगांना समजून घ्या. त्यांना मदत करा. अर्थसाक्षर व्हा, अर्थसाक्षर बनवा!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –