तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे.
सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो.
सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना
- साध्या साध्या गोष्टीतून आपण आपली खाजगी माहिती जाहीर करीत असतो. यातून आपल्यासंबंधीच्या एक एक बारीकसारीक माहितीचा तपशील एकत्र होऊन त्यावर झटकन पृथक्करण करून एक अहवाल तयार होत असतो. याचा उपयोग प्रामुख्याने मार्केटिंगसाठी करण्यात येतो.
- यातील प्रत्येक माहितीची गरज असतेच असे नाही. याचा सदुपयोग करणारे लोक जसे आहेत तसाच दुरुपयोग करणारे लोक आहेत. त्याचा आपल्याला मोठा आर्थिक व सामाजिक फटका बसण्याची शक्यता असल्याने, याबाबत सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.
- काळाबरोबर राहायचे म्हणजे या गोष्टी आपण टाळू शकत नाही. अनेकदा नव्हे प्रत्येकदा आपणच ही माहिती कळत नकळत जाहीर करत असतो. तेव्हा ही माहिती सुरक्षित कशी ठेवावी याची माहितीही आपल्याला असणे आवश्यक आहे.
- या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे तरी याची सर्वाना त्याची ओळख व्हावी या हेतूने सायबर तज्ञ श्री प्रथमेश सोनसुरकर यांचे सायबर सुरक्षा याविषयावर व्याख्यान मुंबई ग्राहक पंचायत यांनी अलीकडेच आयोजित केले होते. त्यास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली.
- श्री प्रथमेश सोनसुरकर हे सायबर सुरक्षा या विषयातील तज्ञ असून या विषयावर जनजागृती व्हावी या हेतूने विविध शाळा, महाविद्यालये, आस्थापना आणि विविध स्नेहसंमेलने यातून कार्यशाळा घेऊन या विषयाची माहिती देत असतात.
- मुंबई विद्यापीठातून माहिती आणि तंत्रज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली असून ते एथिकल हॅकर असून सोशल इंजिनिअर, सायबर क्राइम, कॉर्पोरेट सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, सेक्युरिटी फंडामेंटल यातील तज्ञ आहेत. ते Whitehack (OPC) Pvt Ltd चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असून त्यांना (उद्या) दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी “अर्थसंकेत युवा उद्योजक २०१९” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १
सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम –
- आजकाल प्रत्येक गोष्ट, ती कोणासाठी योग्य, अयोग्य आहे आणि कशी वापरावी यासह येत असल्याने, विविध समाज माध्यमांचा वापर करीत असताना, कोणते माध्यम का? कशासाठी? वापरत आहोत याचे भान ठेवून ते वापरताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
- आपण प्रसारित करीत असलेल्या माहितीचा दुरूपयोग करता येणार नाही व यासाठी कोणती काळजी घ्यावी, तसेच यदाकदाचित दुरुपयोग झालाच तर, कोणती उपाययोजना करावी?
- आपली खाजगी माहिती सुरक्षित कशी ठेवावी? वयात येणारी मुले, मुली, महिला यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? या विषयी उत्कृष्ट विवेचन केले.
- जवळपास ३ तास चाललेल्या संवादात्मक कार्यक्रमातून श्री प्रथमेश सोनसुरकर यांनी, “आपणच आपली माहिती कशी उघड करतो”, हे उदाहरणांसाहित दाखवून दिले. यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या लॅपटॉपचा वापर करून त्यावर आपण पुरवलेली गोपनीय माहिती कशी कुठून कशी मिळवता येते ते दाखवले.
- अनेकदा सूचना देऊनही आपण आपली खाजगी माहिती मोठया विश्वासाने आणि सहजतेने दुसऱ्याना कशी देतो ते वेळोवेळी दाखवून दिले. त्यामुळे सर्वानाच या व्याख्यानातून ‘आपण विश्वास दाखवावा पण ठेवू नये’, असे शिकायला मिळाले.
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २
या कार्यक्रमातून मिळालेली ठळक माहिती –
- ज्या गोष्टीसाठी इंटरनेटची आवश्यकता आहे अशा सर्व गोष्टी या “सायबर” या सदराखाली येतात. त्यामधील आपल्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता म्हणजे “सायबर सुरक्षा”.
- आपले सायबर संबंधित कोणतेही खाते योग्य लॉग इन आयडी पासवर्ड टाकूनही किंवा पासवर्ड विसरल्यास तो नव्याने मिळवता येत नसल्यामुळे आपल्याला वापरता न येणे म्हणजे हॅकिंग.
- आपली सर्वच खाती ई मेलशी संलग्न असल्याने सायबर चोर सर्वप्रथम आपल्या मेलशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आपण इतर ठिकाणी लावलेल्या कुलुपांच्या चाव्यांचा जुडगाच त्याच्या हाती आयताच लागतो.
- सायबर चोरी करणे हे जादूच्या प्रयोगासारखे असून ही चोरी करण्यासाठी आपण स्वतः आपली वैयक्तिक माहिती कळत नकळत पुरवून चोराला मदत करीत असतो.
- सार्वजनिक वाय फाय (रेल्वे स्टेशन, हॉटेल, मॉल) तात्पुरते जॅम करून अल्पावधीत तशाच प्रकारचे आपले स्वतंत्र नेटवर्क निर्माण करून (Man of middle attack) आपली माहिती चोरली जाते. त्यामुळे आपण नक्की कोणते नेटवर्क नेमके वापरतोय तेच समजत नाही. तेव्हा यावर उपाय हाच, की याचा वापर अजिबात करू नये. स्वतःचा कम्प्युटर/मोबाइल स्वतःचे नेट वापरावे.
- दुसऱ्याचा कम्प्युटर/मोबाईल वापरून आपले कोणतेही व्यवहार करू नयेत. यामध्ये आधीच टाकलेल्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने आपली महत्वाची माहिती युजरनेम/पासवर्ड चोरीस जाऊ शकतो.
- आपले प्रत्येक खाते सुरू करण्यासाठी एकदा वापरता येईल असा तात्पुरता सांकेतिक क्रमांक मिळतो (OTP) ही अतिशय चांगली सोय असून (Two- Factor Authentication) यामुळे आपला लॉग इन आय डी व पासवर्ड समजूनही हे खाते चालू करता येऊ शकत नाही. अनेक लोकांना गुगलने अशी सोय उपलब्ध करून दिली आहे याची माहितीच नाही.
- आपण सहज विश्वासाने जी माहिती देतो उदा फीडबॅक फॉर्म, व्हिजिटर रजिस्टर, अँप डाऊनलोड करताना दिलेल्या परवानग्या तिचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा याची आवश्यकता आणि याशिवायचा अन्य पर्याय याचा विचार करावा. ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूच्या पॅकेटवरील नाव नंबर पत्ता सहजपणे टाकून देतो तो समजणार नाही अशा प्रकारे खोडूनच टाकायला हवा.
- डियर कस्टमर, डियर क्लायंट, डियर यूजर या संबोधनाने येणारे मेल हे फेक असण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांना उत्तर न देता नष्ट करावेत. हा मेल नक्की कोणाकडून आला त्यात यात लिंकवर क्लिक करायची विनंती केली असल्यास तसे करू नये.
- https: ने सुरू होणाऱ्या सुरक्षिकतेचे निळे कुलूप असलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. व्यवहार करताना encrypted payment geteway चा वापर करावा. हा अतिशय सुरक्षित मार्ग असून तो सीलबंद पाकिटासारखा आहे.
- सोशल इंजिनिअरिंग अटॅक म्हणजे व्यक्तीच्या बोलण्यातून त्याच्या नकळत त्याची सर्व माहिती मिळवून त्या महितीचा तिच्याविरुद्ध वापर करणे.
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३
- तंत्रज्ञानामुळे जनरेशन गॅप खूप वाढली आहे. आपले खाजगी फोटो शेअर करू नका. असे फोटो आपले मुलं मुली शेअर करत नसतीलच यावर फाजील विश्वास ठेवू नका. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला जेणेकरून ते कोणत्याही गोष्टी आपल्यापासून लपवणार नाहीत किंवा चूक झाल्यास स्वतःहून कबुली देतील.
- अनोळखी लोकांच्या, सामायिक मित्र असलेल्या व्यक्तीच्या मैत्री विनंत्या मान्य करू नयेत. ही गोष्ट विशेषतः किशोरवस्थेत असणाऱ्या वयात आलेल्या मुलामुलींनी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
- १८ वर्षाखालील मुले मुली विशेषतः वयात आलेल्या मुली काय करतात ते पहाण्यासाठी, चाईल्ड केअर अँपचा वापर करून त्यावर लक्ष ठेवू शकतो.
- पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार करायचा असेल उदा. तोकडे कपडे, उघडे अंग असलेले फोटो प्रसारित करणार असाल तर, त्याचे होणारे सामाजिक परिणाम स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे. जेथे आपले फोटो प्रकाशित होऊ होऊन आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोचेल असे आपल्याला वाटते ती आपल्याला ब्लॉक करता येतात.
- आपला मोबाइल, लॅपटॉप, डेस्क टॉप विश्वासाने कोणासही देऊ नये. मोठया प्रमाणात गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
- इंटरनेट बँकिंग करणाऱ्यानी बँकेस वेगळा मोबाईल नंबर आणि वेगळा मेल द्यावा. तो कोणासही शेअर करू नये. नेटबँकिंग करताना स्क्रीनवरील कीबोर्ड वापरावा. पासवर्ड सहज अंदाजाने ओळखता येणार नाही असा पण आपल्याला सहज लक्षात राहील असा ठेवावा.
- आपल्याला आलेली फाईल/ लिंक वापरण्यास योग्य आहे का ते virustototal.com येथून तपासून पहा. संकेतस्थळ सुरक्षित आहे की नाही हे आपण transparancyreport.googal.com येथे जाऊन तपासू शकतो.
- अनेक उपाय योजूनही जर कोणतेही अकाउंट हॅक झाल्यास रिकव्हरी लिंक वापरून आपल्या मॅक ऍड्रेस वरून (ज्या उपकरणावरून आपण हे अकाऊंट सुरू केले) विनंती करता येते.
- मुंबई पोलिसांकडे दर आठवड्यात २६० सायबर क्राइम केसेस नोंदविल्या जातात.
- तुमच्या परवानगीशिवाय तुमची कोणतीही गोष्ट जसे -टेक्सपोस्ट, फोटो, व्हिडीओ कोणीही प्रकाशित करू शकत नाही. DMCA (हा एक आंतरराष्ट्रीय कॉपीराईट कायदा असून तो भारतासह बहुतेक देशांनी मान्य केला आहे) पोर्टल वर यासंबंधी माहिती देऊन ते काढून टाकण्याची विनंती त्याचप्रमाणे त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल.
- पोलिसांकडे सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवताना मुद्देसुद (पंचनाम्यात जेवढी माहिती आवश्यक असते त्याप्रमाणे) आणि स्क्रीनशॉट पुराव्यांसहीत नोंदवावी.
- प्रस्तावित डेटा प्रोटेक्शन बिल २०२० मध्ये डेटा होल्डरचे हित जपले जाईल याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे आपली माहिती का आणि कशासाठी वापरणार, हे जाणून घेण्याचा त्यास हक्क मिळणार आहे.
- न मागता कोणी आपल्याला मदत करत असेल, तर त्याचा गुन्हेगारी हेतू असण्याची शक्यता असते.
- जेव्हा आपल्याला सिस्टीमकडून पासवर्ड जतन किंवा बदल करायचा आहे अशी विचारणा झाली, तर त्यास नकार द्यावा.
- I am not robo, captcha या सारख्या योजना, या व्यक्तीने स्वतःहून विनंती केली आहे, याची खात्री करून घेण्यासाठी असतात.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
या सर्व गोष्टी तंतोतंत अमलात आणणे जरी कठीण असले तरी अशक्य नाही. तेव्हा दुसऱ्यावर आपला १००% विश्वास आहे असे त्याला भासवून, त्याच्यावर विश्वास न ठेवायची कला आता आपल्याला शिकून घेणे गरजेचे आहे.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/