आत्मविश्वास कमी आहे? मग हे नक्की वाचा 

Reading Time: 4 minutes

आत्मविश्वास कमी आहे? 

यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आत्मविश्वास हा मुख्य पाया आहे. आत्मविश्वास कमी असेल, तर ही गोष्ट यशाच्या मार्गातील मोठा अडसर ठरू शकते. आतमविश्वासी व्यक्तींना आत्मविश्वासाचे मूल्य माहिती असते त्यांचे ध्येय निश्चित असते.

“आर्यन आज ब्रेकफास्ट केल्याशिवाय मुळीच बाहेर पडायचे नाही”, आईने म्हणजेच सीमा काकूंनी आर्यनला बजावले आणि ती किचन मध्ये गेली. ब्रेकफास्ट घेऊन ती बाहेर येईपर्यंत आर्यन बाहेर पडलेला !

आता मात्र वैतागूनच काकूंनी कनिष्काला म्हणजे त्यांच्या पुतणीला फोन लावला, “ कनू, अगं आर्यन सतत चिंताग्रस्त वाटतोय. नक्की ऑफिस मध्येच काहीतरी समस्या असणार. तुला सांगतो तो सगळं आणि मोठी बहीण आहेस त्याची, जरा बघ समजावून”.

तसे कनिष्का उत्तरली, “अग काकू तू काळजी नको करूस मी बोलते त्याला.”

कनिष्काचे सध्या घरूनच काम चालू होते. त्यामुळे तिने लगेच आर्यनला फोन लावला, “आर्यन जाताना घरी ये. मी तुझ्या आवडते चिरोटे केले आहेत.

हे नक्की वाचा: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे 

आर्यन आला तसा शांत शांत होता. कनूने थेट विषयाला हात घातला, काय रे आरू काय झालेय सांग पटकन. तसे आर्यन सांगायला लागला, मागच्या महिन्यात मिटिंग मध्ये मी अडखळलो आणि या वेळेस बॉसने, मला माझ्याच प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन नाही करू दिले. असे खुपदा होतेय. बरं, असे पण नाही की मला काही येत नाही. बॉसला पण माहिती मी किती हुशार आहे, तरी पणअसं होतंय.

कनिष्काने त्याला अजून काही प्रश्न विचारले आणि तिला समस्येचा अंदाज आला तशी ती बोलायला लागली, “आरू, मला एक सांग तुझ्या टिममध्ये दोन व्यक्ति आहेत. दोघेही सारखेच हुशार आहेत. मात्र एकजण त्याने जे काही केलेय ते उत्तम विस्तृत करू शकतो, तर दुसर्‍याला हे तितकेसे जमत नाही, तर तू कोणाला तुझ्यासोबत ठेवशील? अर्थातच, पहिल्याला हो ना? इथे फरक काय आहे, समजले ना तुला? आत्मविश्वासाचा! नेमका हाच तुझा प्रॉब्लेम आहे.”

कनिष्का पुढे बोलू लागली, तुझ्यात काहीच आत्मविश्वास नाही, असे काहीही नाही. मात्र मी तुला काही मुद्दे सांगते बघ, त्यातले काही तर तुला नक्की लागू होतील. तर

आत्मविश्वास कमी आहे? मग आत्मविश्वासू व्यक्ती कसे असतात ते पहा –

१. ते स्वतःला कधीच कमी समजत नाहीत –

 • असे म्हटले आहे की, एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचे मूल्य सारखे असते. मात्र याचा अर्थ असा नाही की आपण काहीही न करता आपल्याला किंमत मिळेल. 
 • प्रत्येक व्यक्ती ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असते.
 • प्रत्येकजण आपल्या स्वप्न पूर्तिसाठी झटत असतो. 
 • प्रत्येकाला आपल्या परिभाषेतील आनंदी जीवन जगायचे असते. 
 • तेव्हा आपणही स्वतःला कुठेही कमी न समजता सदैव प्रयत्नशील असावे.

इतर लेख: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र 

२.आपली चूक झाली तरी घाबरत नाहीत –

 • आपल्याला माहिती आहे की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 
 • आत्मविश्वास बाळगणारे लोक नेहमी योग्य गोष्टी शोधण्यावर भर देतात. 
 • दुसरे म्हणजे ते आपल्या चुकांची जबाबदारी घेतात. ते चुकांकडे सुधारण्याची संधी म्हणून पाहतात.

३. ते मोठ्या चालींची वाट पाहत नाहीत –

 • आपल्याला असे वाटते की आत्मविश्वासू व्यक्ती मोठे मोठे निर्णय घेत असतील. त्यामुळे ते पटकन पुढे जातात. पण असे मुळीच नसते.
 • या व्यक्ती जसे जसे शक्य आहे तसे तसे ते पुढे जात राहतात. यशाच्या टप्प्यामध्ये छोटे छोटे टप्पे मिळूनच मोठा टप्पा गाठता येतो. 
 • प्रत्येक वेळेस मोठी उडी मारायच्या प्रयत्नात आपले हे छोटे टप्पे देखील सुटतात आणि अर्थातच मोठी उडी म्हणजे मोठा धोका ! 
 • जेव्हा जशी संधी मिळेल तेव्हा तसे छोटे – मोठे टप्पे गाठत राहायचे मात्र वाट पाहत नाही थांबायचे.

४. ते ऐकल्याशिवाय बोलत नाहीत –

 • अशा व्यक्तींना बर्‍याच विषयातील ज्ञान असते. तथापि ते समोरच्याचे बोलणे/ मत पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय व्यक्त होत नाहीत. समोरच्या व्यक्तींना व्यवस्थित जाणून घेण्यासाठी त्यांचे विचार/ मत ऐकण्यात या व्यक्ती रस घेतात. 
 • जेव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळते, तेव्हा ते पूर्णपणे ऐकून घेतलेल्या विषयावर आरामात आणि आत्मविश्वासाने बोलू शकतात.

हे नक्की वाचा: या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य 

५. ते कम्फर्ट झोनमध्ये राहत नाहीत –

 • कम्फर्ट झोन ही अशी जागा आहे ज्या मध्ये आपण असलो तर आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत.
 • हे विश्वासू लोकांना ठावूक असते. त्यामुळे ते सतत कम्फर्ट झोनच्या बाहेर असतात आणि प्रत्येक वेळी नवीन उच्च पदावर पोहोचेपर्यंत ते शांत बसत नाहीत.

६. ते सोशल मीडियावर दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत –

 • सोशल मीडिया वरती सगळे कसे परिपूर्ण दिसते, आनंदी जोडपी, स्वप्नातील करिअर, यशस्वी मिटिंग्स! 
 • हे आभासी जग आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगले- वाईट दिवस, समस्या हे येतच असते. फक्त सोशल मीडिया वरती ते दिसत नसते.

7. ते मदत मागण्यासाठी संकोच करत नाहीत –

 • ज्या लोकांचा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास आहे ते आपल्या कमकुवत बाजू स्विकारण्यास घाबरत नाहीत, कारण सर्व उपलब्ध स्त्रोत वापरुन ते यावर मात करू शकतात. 
 • मदतीसाठी विचारून ते त्यांच्या कौशल्यामध्ये भर घालू शकतात आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या इतर लोकांकडून शिकू शकतात. 
 • जेव्हा ते मदत घेतात, लोक त्यांचा अधिक आदर करतात आणि त्या व्यक्ती कौतुकास पात्र ठरतात.

८. ते दुसर्‍यांना दोष देत नाहीत –

 • खूप आत्मविश्वास बाळगणारे लोक स्वतःच्या कृती साठी स्वतः जबाबदारी घेतात. 
 • ते दुसर्‍यांवरती खापर फोडत नाहीत. त्यांना माहीत आहे की आपल्या जीवनातील कृतींसाठी आपणच जबाबदार असतो आणि अशी जबाबदारी घेणे हे सबलीकरणाचे प्रतीक आहे.

९. ते नवीन गोष्टी शिकायची संधि सोडत नाहीत –

 • नवीन काही शिकणे म्हणजे अपयश आणि चुकांची भीती जास्त असते. 
 • मात्र यांची तमा न बाळगता ही लोकं सतत नाविन्याचा ध्यास घेतात. जेणेकरून त्यांनी शिकलेल्या काही गोष्टी तरी ते अगदी अचूक आत्मसात करतात.

१०. ते स्वतः वर लक्ष देत नाहीत –

 • याचा अर्थ अधिक आत्मविश्वास असणारे लोकं स्वतःवर कमी लक्ष केंद्रित करतात.
 • सर्वजण माझ्याकडे पाहत आहेत/ ते लोकं मला हसत असतील काय किंवा मी काही चुकीचे बोलून गेलो काय, असे विचार आपला आत्मविश्वास कमी करतात. 
 • खरंतर दुसरे काय विचार करतात यापेक्षा आपण स्वतःच त्या विचारांमध्ये गुरफटून जातो.

 “आत्मविश्वास कमी असू शकतो आणि तो नक्कीच वाढवता येतो. तेव्हा या गोष्टींवर नक्की विचार कर आरू”, असे बोलून कनिष्का बोलायचे थांबली.

पुढच्याच महिन्यात तिला अर्णवचा “तुझ्यामूळे गेल्या महिन्याभरात खूप सुधारणा झालीये. आज ट्रीट तुला माझ्याकडून”, असा फोन आला.  तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचा आत्मविश्वास कमी आहे, तर या लेखामधील मुद्द्यांचा नक्की विचार करा.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies  

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *