इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!

Reading Time: 3 minutes

लहानपणी ज्या गोष्टींविषयी मला प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता होती, अशा गोष्टींपैकी एक असलेला लॅपटॉप काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमधून मी विकत घेतला. दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली. ऑफिसमधील जवळच्या व्यक्तींना ‘स्विट्स’ देत असताना, एका सहकाऱ्याने मला प्रश्न विचारला, 

“सर, लॅपटॉप कॅश घेतला की EMI मध्ये ?”

या प्रश्नाने, भूतकाळातील अनेक घटनांचा पट एका क्षणातच माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिला. उत्तरादखल मी त्यांच्याकडे पाहत एक स्मित केलं आणि म्हणालो, “जेवण झाल्यानंतर (लंच टाईममध्ये) निवांत बोलूयात.”

ठरल्याप्रमाणे, जेवण झाल्यानंतर त्या सहकाऱ्याचे डोळे माझ्याकडेच पाहत होते. माझं उत्तर ऐकण्याची उत्सुकता त्यांच्या नजरेतून झळकत होती. त्यांच्या या प्रश्नाला मी दिलेलं उत्तर आज इथे सांगावसं वाटतं…

श्रीमंतीच्या मार्गातील ‘अडथळे’

  • लहानपणी मी औरंगाबादमध्ये टाकळकर काकांच्या हॉटेलवर वेटर म्हणून काम करत होतो. आमच्यातील नातं मालक आणि नोकर असं असलं, तरी ते मात्र मला नेहमी स्वतःच्या मुलासारखीच वागणूक देत असत.
  • मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अडचण त्यांना सांगत असे. हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांपैकी एखाद्या कुटुंबामध्ये माझ्या वयाचा मुलगा असला की त्याचे हट्ट आणि ते पुरवणारे त्याचे आईवडील पाहून माझे डोळे भरून येत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आपण असे हट्ट करणं योग्य नाही याची जाणीव सतत मनाला होत असे. 
  • टाकळकर काका हे एक उच्चशिक्षित आणि साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व! ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता आणि दासबोध यांसारख्या ग्रंथांचे मोठे अभ्यासक. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये, जीवनाकडे सोप्या दृष्टिकोनातून पाहण्याचं तत्वज्ञान समाविष्ट असे. 
  • सततच्या अडचणी आणि भवितव्याची सतावणारी चिंता यांमुळे माझा उतरलेला निराश चेहरा पाहून काका नेहमी म्हणत, “प्रणव, स्वतःला कधीही इतरांसारखा सामान्य समजू नकोस, माणसाचा उत्कर्ष होण्याचा मार्ग नेहमी अडचणी आणि संकटं यांमधून जाणारा असतो. जन्मापासून ज्यांना सर्वकाही अगदी सहज उपलब्ध होतं, ते पुढे कितीही धनवान झाले तरी आयुष्यातील नकारात्मक घटनांकडे सजगतेने पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात कधीच येत नाही. परिणामी किंचितशा आघातांनीसुद्धा असे लोक डगमगून जातात. प्रतिकूल परिस्थिती माणसाला स्वतःला घडवण्याचा मार्ग दाखवत असते. निरर्थक गोष्टींवर विचार करण्यात वेळ व्यर्थ दवडण्यापेक्षा काहीतरी भरीव आणि शाश्वत मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहा. मला विश्वास आहे, भविष्यात तू सर्व काही स्वतःच्या हिंमतीवर मिळवशील.” 
  • त्यांचे हे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा विश्वास मला नेहमी कोड्यात टाकत असे. माझी तेव्हाची परिस्थिती पाहता आपल्या आयुष्यात कधी चांगले दिवस येऊ शकतील, आपल्याला गरजेच्या वस्तूदेखील विकत घेता येतील असं मला कधीच वाटलं नव्हतं.
  • थोडा मोठा झालो तेव्हा समजलं, की महागड्या परंतु गरजेच्या असलेल्या गोष्टी विकत घेण्यासाठी कर्ज/फायनान्स अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. पुण्याच्या एका कंपनीत जेव्हा कॉन्ट्रॅक्ट वर्कर (Contract worker) म्हणून कार्यरत होतो, तेव्हा सोबत काम करणारे कामगार मित्र अगदी २०-२२ हजार रुपयांचे मोबाईल ईएमआयद्वारे विकत घेत. नंतर त्याचे हफ्ते मासिक वेतनातून कपात होत असत. हफ्ते भरण्यासाठी खात्यात पैसे राहावेत म्हणून त्या लोकांची चाललेली धडपड पाहून मला फार वाईट वाटत असे.

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

  • “माणसानं आपल्या गरजा (Needs) आणि आपल्या आवडीनिवडी (Wants) आपल्या कुवतीनुसार ठेवाव्यात. गरजेची वस्तू काटकसरीने पैसे साठवून विकत घेणं आणि आवडीची वस्तू गरज म्हणून विकत घेणं यामधील फरक ओळखावा. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी, कर्जावर अवलंबून न राहता, अतिरिक्त खर्चावर आळा घालत, स्वतःची आर्थिक क्षमता वाढवण्यावर भर दयावा.” या मताचा मी होतो; आणि आजही आहे. 
  • फायनान्स अथवा कर्ज काढून आवडीच्या वस्तू विकत घेणं हे म्हणजे आपल्या परिस्थितीचं भान न ठेवता, आर्थिकरित्या सक्षम होण्यावर भर न देता, पैशांची बेलगाम उधळपट्टी करत एखाद्या पळवाटेनं पळून जाण्यासारखं मला वाटे. पुण्याच्या त्या कंपनीमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या मित्रांचे महिनाअखेरीस होणारे हाल पाहूनच मी ठरवलं होतं की, भविष्यात जी वस्तू मी विकत घेईन ती पूर्णपणे रोख रकमेतच आणि तेही मी स्वतः कमावलेल्या पैशांनी विकत घेईन, कर्ज काढून अथवा फायनान्स करून नव्हे!”
  • ‘Rhonda Byrne’ नामक प्रख्यात लेखिकेचं एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे, ‘The Secret’ हे त्याचं नाव. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि श्रद्धा यांचं आपल्या जीवनातील महत्व काय ? ते या पुस्तकातून समजून येतं. 

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

  • जे विचार आपल्या मनात येतात, त्यांच्या मानसप्रतिमा आपल्या मनात तयार होत असतात. आणि या मानसप्रतिमाच आपल्या विचारांमध्ये असलेल्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करत असतात. ह्यालाच ‘Law Of Attraction’ असं म्हणतात. फार पूर्वी जो निश्चय मी केला होता, त्यामुळेच कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याची वेळ माझ्यावर कधी आलीच नाही, आणि भविष्यातही मी ती येऊ देणार नाही असा विश्वास मला आहे.

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा  हे ७ कानमंत्र

खरंतर, आजच्या काळात ३०-४० हजार रुपयांची एखादी वस्तू विकत घेणं ही काही मोठी गोष्ट नाही. पण वैयक्तिक पातळीवर सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा मात्र मला ही लहानशी का असेना पण ‘Achievement’ वाटते. या गोष्टी खरंतर आपल्या एकट्याच्या प्रयत्नाने साध्य होतात असं नाही. आपण केलेली सत्कर्म, थोरांचे आशिर्वाद आणि ईश्वरकृपेने या गोष्टी फळास येतात अशी माझी श्रद्धा आहे आणि या सर्व गोष्टींकरिता मी सदैव कृतज्ञ राहीन.

– प्रणव उन्हाळे 

(प्रणव उन्हाळे हे एक युवा पुस्तकप्रेमी व समिक्षक असून, ते त्यांच्या फेसबुक पेजवर पुस्तक वाचनाचे अनुभव लिहितात.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4]

One thought on “इच्छा आणि गरज यामधला फरक – गोष्ट एका लॅपटॉपची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *