मारुतीची कारची होम डिलिव्हरी

Reading Time: 2 minutes
 • कोपऱ्यावरचा दुकानदार डाळ, तांदूळ आपल्या घरी पोहचवितो, हे आपणास माहिती आहे. अलिकडल्या काळात इडली, डोसा, भेळ हे पदार्थ देखील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने घरपोच येऊ लागले आहेत.  या सोयीमुळे ग्राहकाला वाहतुकीसाठी द्यावा लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते.

 • परंतु, यापुढे ‘मारुती’ देखील आपल्या घरी येईल याची क्वचितच कोणाला माहिती असेल. पुराणातला मारुती राम व लक्ष्मणास खांद्यावर घेऊन फिरत असे. आधुनिक काळामधील मारुतीदेखील असेच तुम्हाला आणि कुटुंबाला घेऊन फिरेल. कारण आधुनिक काळामधील मारुती म्हणजे ‘मारुती गाडी’!

 • भारताच्या अर्थमंत्र्यांनी वाहन उद्योगामधील मंदीची दखल घेताना उबेर, ओला यांना नावं ठेवली. इलेक्ट्रिक कारच्या होणाऱ्या आगमनामुळे सध्या वाहन कंपन्या अनेक प्रकारे उपाययोजना करीत आहेत. यातील मारुती कंपनीची नवी क्लुप्ती म्हणजे खरेदी केलेल्या गाडीची घरपोच सेवा देण्याची सोय!

 • उद्योगातज्ञांच्या मतानुसार, ग्राहक चोखंदळ असतात. खरेदीच्या वेळी आप्तस्वकीय, मेकॅनिक व  वेबसाईटच्या माध्यमातून सर्व गाड्या, त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत यांची माहिती घेतात. त्यानंतर सर्व  कुटुंब विचार विनिमय करून कोणती गाडी घ्यायची हे ठरविते. नंतर उरते ते केवळ गाडी आरक्षित करून तिला आपल्या घरी घेऊन जाण्याची आनंददायी प्रक्रिया.

 • परंतु, मारुतीच्या या उपक्रमामुळे ग्राहकांची सोय आणि संतोष अधिक वाढविता येईल व कंपनीला पाठिंबा देणारा ग्राहकवर्ग तयार होईल.

काय आहे योजना?

 • घरपोच गाडी देणाऱ्या या योजनेमध्ये  ग्राहकाने मागणी नोंदविल्यानंतर, त्याला मागणीसाठी गाडी घरी पाठविली जाईल.  ग्राहक गाडी चालवून पाहिल व त्यानंतर आपल्या पसंतीनुसार गाडी निवडून ती निश्चित करेल.

 • कंपनी बँकांशी संपर्क साधून ग्राहकाच्या घरीच गाडीसाठी कर्जमंजुरी प्रक्रिया पाडेल.

 • पैसे प्राप्त झाल्यानंतर ग्राहकास गाडी घरपोच प्राप्त होईल.

 • अशा प्रकारे ग्राहकास विनासायास वाहनप्राप्ती होईल.

 • यामध्ये आज एक अडचण म्हणजे कर्जमंजुरीसाठी घरी येण्याची सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांची आज तयारी नाही.

 • मारुती कंपनीने वाहन देखभाल आणि दुरुस्तीची घरपोच सेवा सुरु केली असून त्याला उत्तम प्रतिसाद आहे. अद्ययावत उपकरणांनी सज्ज वाहन कंपनी आपल्या दाराशी येऊन सेवा पुरवीत आहे. याचे सर्व स्तरांवर स्वागत होईल.

 • पुढील कालावधीमध्ये सर्वच वाहन कंपन्यांना याचा कित्ता गिरवावा लागेल, यात शंका नाही.

 • भविष्यामध्ये ग्राहकांना वस्तू व सेवांसाठी विक्रेत्याकडे जाण्याऐवजी घरपोच मिळण्याचे युग चालू होईल ही आशा!

    ग्राहक देवो भव !

– सी.ए. चंद्रशेखर चितळे

(श्री.चंद्रशेखर चितळे चार्टर्ड अकाउंटंट असून दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडियाचे सेंट्रल कौन्सिल सदस्य आहेत.)

 अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!