गुंतवणूक करण्यास योग्य वेळ कोणती? हे सातत्याने बदलत असल्याने एकरकमी गुंतवणूक न करता एसआयपी (SIP) च्या माध्यमातून टप्याटप्याने करावी असे सांगण्यात येते. ही गुंतवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी होऊ शकेल, यात कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळता येतील यासंबंधीचे हे चिंतन.
एसआयपी(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय…
- म्युच्युअल फंड युनिट मधील गुंतवणूक हा एक मध्यममार्ग आहे.
- यात धोका असला तरी भांडवल बाजारातील प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा तो थोडा कमी आहे.
- ही गुंतवणूक आपल्या वतीने फंड व्यवस्थापन करत असल्याने, यासाठी येणारा खर्च आपल्याकडून घेतला जात असल्याने यातून फायदा होवो अथवा न होवो त्यासाठी काहीतरी किमान खर्च येतोच.
- सेबीने सुचवल्याप्रमाणे आता म्युच्युअल फंडाच्या निरंतर योजनांचे ६ मुख्य प्रकार असून ३६ उपप्रकार आहेत.
- उपप्रकारांच्या नावावरून भांडवल बाजारातील कोणत्या प्रकारात ही गुंतवणूक प्रामुख्याने केली जाईल ते सूचित केलेले आहे.
- त्यानुसार यातील सर्वाधिक गुंतवणूक ही त्याच पद्धतीने करण्यात येते.
- याचप्रमाणे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप म्हणजे कोणत्या कंपन्या त्यांचेही निकष ठरवले असून दर सहा महिन्यांनी याचा आढावा घेऊन त्यांची यादी अद्ययावत केली जाते.
- पारंपरिक बचत साधनांत असलेली सुरक्षितता त्यातील सातत्याने कमी कमी होत असलेला परतावा त्याचबरोबर विविध कारणाने महागाईत होत असलेली वाढ, यास कोणताही ठोस पर्याय उपलब्ध नाही.
- गुंतवणूकदारांकडे थेट समभागात अथवा डिरिव्हेटिव उत्पादनात गुंतवणूक करण्याऐवढे कौशल्य नसल्याने, त्याचबरोबर ते प्राप्त करून घेण्याची इच्छा नसल्याने, या ताळेबंदीच्या परिस्थितीतही म्युच्युअल फंड गुंतवणूकीत फारशी घट झालेली नाही, असे मे २०२० ची अधिकृत आकडेवारी सांगते.
“एसआयपी” गुंतवणूक करताना या ५ चुका टाळा…
म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करतांना कोणती काळजी घ्याल?
१. आपले लक्ष काय?
- आपली ही गुंतवणूक नक्की कशासाठी आहे, किती कालावधीकरता आहे, यातून किती परतावा अपेक्षित आहे ते निश्चित ठरवावे त्याप्रमाणे योजना निवडावी.
- लार्ज कॅप मधील गुंतवणूक किमान परतावा देत असली तरी ती स्मॉल कॅप मिड कॅप सारखी मोठ्या प्रमाणात वर-खाली होत नाही. त्यामुळे सुरक्षित असा चांगला परतावा यातून दिर्घकाळात मिळू शकतो.
- या उलट स्मॉल, मिड कॅप मधून मोठा परतावा मिळण्याची शक्यता असल्याने त्यातून अधिक परताव्याची अपेक्षा करता येईल. बाजार दिशेप्रमाणे आपल्या गुंतवणूक प्रकारात आवश्यक बदल करणारे मल्टी कॅप फंड दिर्घकाळात चांगला परतावा देतील.
गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर…
२. कमी कालावधीसाठी गुंतवणूक:
- एसआयपी ची तुलना रिकरिंग डिपॉजिटशी करण्यात येते.
- सरासरी नगद मालमत्ता मूल्याचा यामुळे फायदा होत असला तरी असा फायदा फक्त सातत्याने वरती जाणाऱ्या बाजारात शक्य आहे.
- अनेक कारणाने बाजार वर खाली होत असतो. तो फारच कमी कालावधीसाठी एक दिशा पकडतो. त्यामुळे यातून होणारा फायदा मिळण्यास दीर्घकाळ लागतो तेव्हा अल्पकालीन फायद्याच्या उद्देशाने एसआयपी करू नये.
- एसआयपी आणि रिकरिंग यात दरमहा पैसे जातात एवढेच साम्य आहे.
गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे…
३. योग्य फंड निवड:
- योग्य प्रकारचा फंड निवडणे हे कौशल्याचे काम आहे. कोणत्या क्षेत्रांचा भविष्यकाळ उज्वल आहे याचा वेध घेणारी गुंतवणूक करावी.
- काही गुंतवणूक क्षेत्रे ही चक्रावर्ती असतात ठराविक कालखंड गेला की त्यात तेजी येते तेव्हा ज्यांचे भविष्य आपल्या गुंतवणूक काळात योग्य असेल असे वाटते अशा फंडातच गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरते.
म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा……
४. एसआयपी थांबवण्याचा निर्णय घेणे: (SIP Withdrawal)
- फंड हाऊसकडून सातत्याने येणारे मेल आपणास कायम आपल्या गुंतवणूकीची स्थिती त्यातील वार्षिक परताव्यासह दाखवत असल्याने, सातत्याने वाढ जशी सुखावते, तसेच त्यात होणारी घट टोचत राहते.
- यात सातत्याने वाढ जितकी सुलभतेने स्वीकारली जाते तेवढीच त्यात होणारी घट निराशेत भर टाकते. यामुळे एसआयपी बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.
- खरंतर गुंतवणुकीत वाढ करण्याची ही वेळ असते त्यामुळे अधिक युनिट आपल्याला मिळू शकतात तेव्हा यात भर टाकता आली नाही तरी किमान चालू योजना बंद करू नये.
म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?…
५. एसआयपी चालू करून विसरून जाणे: (SIP Tracking)
- अनेक जण एसआयपी चालू करून त्याकडे अजिबात पहात नाहीत.
- ज्याप्रमाणे या गुंतवणुकीकडे सातत्याने पहात राहू नये हे जितके धोकादायक आहे तितकेच अजिबात न पहाणे हे सुद्धा खूप नुकसान करणारे ठरू शकते.
- आपल्या १० वर्षांच्या एसआयपी कालखंडात किमान २ वेळातरी आपणास अनपेक्षित परतावा मिळतो. अशा वेळी हा परतावा काढून घेऊन सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेकडे अंशतः वळवून भांडवल निर्मिती करण्याकडे भर द्यावा. असे करत असताना एसआयपी चालूच ठेवावी.
म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती…
६. योग्य संधीची वाट पाहणे:
- अनेकदा गुंतवणूक संधी साधण्यासाठी वाट पाहिली जाते.
- आपली गुंतवणूक योग्य वेळी व्हावी अशी इच्छा असणे स्वाभाविक असले तरी अनेकदा अशा संधीची वाट पहात बसल्यास ती हुकली की नंतर समजते आणि निराशा येते.
- तेव्हा अशी वाट न पाहता विनाविलंब गुंतवणुकीची सुरुवात करावी.
एसआयपी (SIP) बद्दल झटकन ज्या गोष्टी सुचल्या त्या आपल्यासमोर मांडल्या. ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडत असल्याने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आपल्या सल्लागाराशी संपर्क साधावा. या संदर्भातील अधिक माहिती मिळवत राहावे.
– उदय पिंगळे
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies