सध्याच्या धकाधकीच्या जगात जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. प्रवासासाठी लागणारी साधने आता आधुनिक झाली आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये चारचाकी गाडी ही फक्त चैनीची वस्तू म्हणून समजली जात होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. प्रत्येकाला आता स्टेट्स सिम्बॉल म्हणून चारचाकी असावी असे वाटायला लागले आहे. शिवाय चारचाकी वाहनामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला आहे.
एक मिरवण्याची गोष्ट किंवा ओळख म्हणून देखील कारकडे लोक पाहत असतात. घरात तीनपेक्षा जास्त सदस्य असल्यास कार असणे गरजेचे असू शकते. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे प्रत्येकालाच आर्थिक मंदीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मागच्या दोन वर्षांमध्ये कार खरेदी कमी झाली आहे. मात्र आता जनजीवन सुरळीत चालले असल्यामुळे कार खरेदी करण्याचा ओघ वाढला आहे. यातच जुन्या वापरलेल्या कार खरेदी करण्यावर ग्राहक विशेष भर देत आहेत.
अनेक ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सेंकड हॅन्ड कार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. एवढंच नाही तर आता सेंकड हॅन्ड कार खरेदी करताना कर्ज घेण्याची सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर सेकंड हॅन्ड कार खरेदी करत आहेत. आजच्या या लेखातून आपण सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ? याबद्दल जाणून घेणार आहोत.
सेकंड हॅन्ड कारची व्याख्या –
- एखादी कार एक किंवा त्यापेक्षा जास्त मालकांनी वापरल्यास त्याला आपण सेकंड हॅन्ड कार म्हणतो.
- सेकंड हॅन्ड कारची सामान्यतः परिस्थिती ही चांगली असते. crisil.com ने दिलेल्या अहवालानुसार सुमारे ४२ लाख भारतीय हे सेकंड हॅन्ड कार चालवत आहेत. लॉकडाउन दरम्यान सेकंड हॅन्ड कारच्या विक्रीत 115%ने वाढ झाली आहे.
सेकंड हॅन्ड कार खरेदीसाठी कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ पाच गोष्टी
१. आर्थिक नियोजन पक्के करा –
- 30 लाखांची BMW कार ही अर्ध्या किंवा नवीन कारच्या एक तृतीयांश किंमतीत खरेदी करता येते. हे ऐकताना सोपे वाटत असले तरी यासाठी पैशांचे नियोजन चांगले असायला हवे. लोकप्रिय कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार आपण कमी किंमतीत खरेदी करू शकतो.
- आपला मासिक खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, यासोबतच इतर कर्जाचे हप्ते लक्षात घेऊनच सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावे. अन्यथा आर्थिक बोजा वाढून आपण अडचणीत येऊ शकतो.
२. वाहन कर्जासाठी डाऊन पेमेंटची व्यवस्था करावी-
- सेकंड हॅन्ड कार खरेदी करत असताना नेहमी कारची परिस्थिती लक्षात घेऊन कर्ज मंजूर केले जाते. यासाठी विविध गोष्टींची तपासणी करण्यात येते. विविध बँकानुसार कर्ज देण्याबाबत स्थिती बदलत राहते.
- कर्ज मंजुरीची रक्कम ही कारच्या किंमतीच्या 70-80% इतकीच दिली जाते. बाकीची रक्कम ही कर्जदाराला आपल्या खिशातून द्यावी लागते.
- सेकंड हॅन्ड कारच्या देखभालीसाठी जास्त खर्च येत असल्याचा मुद्दा देखील बँकेकडून विचारात घेतला जातो. त्यामुळे कर्जाची रक्कम मंजूर करून घेत असताना कर्जदाराने डाऊन पेमेंटची व्यवस्था करावी
नक्की वाचा : या १० मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर
३. कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया –
- सेकंड हॅन्ड कार खरेदी करत असताना कागदोपत्री प्रक्रिया किचकट आणि गुंतागुंतीची असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे कारच्या खरेदी पासून तर ती नावावर होईपर्यंत बराच वेळ लागतो. याशिवाय कारवर कर्ज मंजूर होण्यापर्यंत बॅंकांकडून सर्वच गोष्टींची खबरदारी घेतली जाते.
- आपण ज्या व्यक्तीकडून कार खरेदी करत आहोत त्याने जर नोंदणी प्रमाणपत्र किंवा विम्याची कागदपत्रे न दाखवल्यास बँक सरळ कर्ज नाकारते. अशावेळी कागदपत्रांची योग्य ती पूर्तता कर्जदाराकडून बँकेला झालीच पाहिजे.
४. कर्जाच्या रकमेचे व्याज आणि कर्ज फेडीचा कालावधी –
- सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना कर्ज घेतल्यास व्याजदर किमान 14% ते 20% पर्यंत असतो. नवीन कार खरेदी करत असताना सरासरी 8-10% पर्यंत व्याजदर आकारला जातो.
- सेकंड हॅन्ड कारची किंमत ही ढासळत असल्यामुळे तिच्या किंमतीनुसारच कर्ज मंजूर करण्यात येते. अशावेळी कर्ज घेतल्यास जास्तीत जास्त 5 वर्षांच्या काळातच कर्जाची परतफेड करावी लागते. सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना हा नियम जाचक वाटू शकतो.
- जास्त किमतीची सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याऐवजी कमी किमतीची नवीन कार खरेदी करावी का याचाही विचार तुम्ही करायला हवा.
५. सुवर्ण कर्ज –
- सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना सर्वोत्तम पर्याय म्हणजे सुवर्ण कर्ज घेणे. सोन्याचे कर्ज हे तारण ठेवलेल्या सोन्यावर दिले जाते आणि ते सुरक्षित असते. त्याला व्याजदरही इतर कर्जांच्या तुलनेत कमी असतो. शिवाय जाचक कागदपत्रांची कोणतीही अट सोने तारण करताना नसते.
- तुमच्याकडे पुरेसे सोने उपलब्ध असेल तर ते बँकेला तारण ठेवून कर्ज घ्या आणि या सोने तारण कर्जाचा उपयोग सेकंड हॅन्ड गाडी घेण्यासाठी करा.
६. कार खरेदीसाठी इतर आर्थिक पर्यायांचा विचार करणे –
- सेकंड हॅन्ड कार खरेदी करत असताना कर्ज मिळवताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. वैयक्तिक कर्जाचा कालावधी हा सामान्यतः कार कर्जापेक्षा जास्त असतो.
- कारच्या किंमती इतकी रक्कम तुम्ही वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून सहज मंजूर करून घेऊ शकता. मात्र यामध्ये सिबिल स्कोअरला विशेष महत्व दिले जाते. कमी सिबिल स्कोअर असल्यास जास्तीचे कर्ज मिळणे अत्यंत कठीण आहे, हे मात्र नक्की.
नक्की वाचा – डिजिटल सोने म्हणजे काय रे भाऊ?
निष्कर्ष –
- सेकंड हॅन्ड कार खरेदी करत असताना अत्यंत बारीक गोष्टींकडे आपले लक्ष असायला हवे. अनेक वेळा सेकंड हॅन्ड कारसाठी आपण कर्ज घेतल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणावर व्याजाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे सर्व पर्यायांचा योग्य अभ्यास करून सेकंड हॅन्ड कारची खरेदी करायला हवी.
- कार खरेदी ही आपली गरज आहे की हौस आहे याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.