गेल्या काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आलेल्या एका बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असेल, ती बातमी म्हणजे, “साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक, हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा.”
आजच्या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या गुन्ह्यांसाठी करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. “सोय तितकी गैरसोय” म्हणतात ते काही उगाच नाही.
अनेक सुशिक्षित लोकही सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला भुलून आपल्या बँक खात्याची व वैयक्तिक माहितीही देतात आणि लाखो रुपये गमावतात.
फसवणूक करणारे अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढवत असतात. पुणे सायबर शाखेकडे ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले होते़. यापैकी वर्षभरात ४९ आरोपींना अटक करण्यात पुणे सायबर गुन्हा शाखेला यश मिळाले आहे़. परंतु अजूनही अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत. ते कदाचित आपल्या आजूबाजूलाच वावरत आहेत. त्यामुळे सावध राहणे खूप आवश्यक आहे.
बँकिंग फ्रॉड:
- या प्रकारात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. कॉल करणारे पीडित व्यक्तीच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून, बँक खात्यासंबंधित काही समस्या निर्माण झाल्याचे सांगून, त्याचे निराकरण करण्यासाठी काही वैयक्तिक माहिती मागतात. यामध्ये पीडिताची वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक, पिन आणि इतर माहिती घेऊन त्यांचे बँक अकाउंट हॅक केले जाते.
- अनेकदा एलआयसीच्या (LIC) ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले जाते. “तुमची पॉलिसी मॅच्युअर झाली असून त्याची रक्कम (ही रक्कम अनेकदा लाखांच्या घरात असते) थेट बँक खात्यात जमा होईल”, असे सांगून, बँक खात्याबद्दल तसेच वैयक्तिक माहितीही मिळविली जाते.
- अनेकदा नवीन क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स जारी करण्यात येणार आहे असे सांगून, त्यासाठी डेबिट / क्रेडिट कार्डची सर्व माहिती व सीव्हीव्ही क्रमांक (CVV) मागितला जातो. त्यानंतर बोलण्यात गुंगवून ओटीपीही मागितला जातो. एकदा का व्यक्तीने ओटीपी दिला की मग काही सेकंदात त्याच्या बँक खात्यातील पैसे गायब होतात. त्यानंतर तो फोन नंबर कायमसाठी बंद झालेला असतो.
- वरील प्रकरणांमध्ये ओटीपी शेअर केला असेल, तर त्या प्रकरणात फसवणुकीची रक्कम बँकेकडून रिफंड केली जात नाही़. पैसे विविध मर्चंट वॉलेटमध्ये गेलेले असल्यास सायबर सेलकडून संबंधितांना तातडीने मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
टीप: बँक अथवा इंश्युरन्स कंपनी कधीही कोणत्याही व्यक्तीला फोन करून कधीही सीव्हीव्ही क्रमांक व ओटीपी विचारत नाही.
सोशल मीडिया फ्रॉड:
- फेसबुकवर (वा तत्सम सोशल मीडिया वेबसाइटवरून) मैत्री करून हजारो/लाखो रुपयांना गंडा घातला अशा प्रकारच्या बातम्या आजकाल आठवड्यतून किमान एकदा तरी वाचनात येतात.
- यामध्ये कुठल्या तरी परदेशी व्यक्तीचा फोटो व त्या धाटणीचे नाव घेऊन एक फेक अकाउंट बनविण्यात येते. यामध्ये परदेशातील अनेक फोटो अपलोड करण्यात येतात.
- यांनतर सावज हेरून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविण्यात येते. हळूहळू मेसेंजरवर मेसेज करून सावज जाळ्यात अडकवलं जातं.
- यानंतर तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे, ते कस्टम मधून सोडविण्यासाठी गुन्हेगार त्याच्या अकाउंटला पैसे भरण्यास सांगतो अथवा भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून आर्थिक अडचण, आरोग्यविषयक समस्या, इत्यादी अनेक कारणे सांगून पैसे भरण्यास सांगण्यात येतात.
- मेसेंजरमधला संवाद, शेअर केलेले वैयक्तिक फोटोज, व्हिडीओज अथवा वैयक्तिक गोष्टी व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेल केले जाते व पैसे उकळले जातात.
टीप: सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना योग्य ती काळजी घ्या. शक्यतो अशी रिक्वेस्ट स्वीकारूच नका. अनोळखी व्यक्तींशी मेसेंजरवर तर अजिबात बोलू नका. आपली वैयक्तिक माहिती, घरगुती गोष्टी, फोटोज कोणाशीही शेअर करू नका.
मोबाईल फ्रॉड /परदेशी कॉल्स:
-
- मोबाइलवर अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांच्या नावावरून फोन आल्यास मनात कुतूहलाची भावना निर्माण होत असली, तरी दुसऱ्या बाजुला या कुतूहलाची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागली आहे.
- गेल्या सात ते आठ वर्षांपासून नायजेरिया देशांतून मोठ्या प्रमाणावर कॉल येत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
- मोबाइलवर ‘True Caller’ हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणाऱ्या फोनची माहिती कळते.
- गेल्या काही दिवसांपासून मोबाइलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच इतर काही देशांमधून फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाइनवर देखील अशा प्रकारचे फोन येत आहेत.
- “आपण लॉटरी जिंकली आहे, त्यासाठी आपली वैयक्तिक माहिती हवी आहे”, असे मेसेजेस करून वैयक्तिक माहिती व बँक खात्याची माहिती मिळवली जाते आणि नंतर ह्या माहितीच्या आधारे आपले सगळे पैसे काढून घेतले जातात.
टीप: नागरिकांनी मोबाइलवर आलेल्या संशयास्पद फोनला उत्तर न देणे शहाणपणाचे आहे.
इतर फ्रॉड:
- कंपन्यांची फसवणूक:
- हॅकर्स भारतीय कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या परदेशी कंपन्यांचे ईमेल हॅक करतात व दोन कंपन्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेऊन, परदेशी कंपन्यांचे फेक ईमेल आयडी बनवतात व भारतीय कंपन्यांशी ई मेलद्वारे संपर्क साधून दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जातात.
- अलीकडेच इटलीची कंपनी ‘टेक्निमोंट एसपीए’च्या भारतीय युनिटमध्ये सायबर फसवणुकीची घटना आजवरची भारतातील ‘सायबर क्राईम’ जगतातील सर्वात मोठी घटना ठरली आहे.
- नोकरीचे अमिष:
- नोकरीसाठी नामवंत कंपन्यांच्या वेबसाईटसारखी फेक वेबसाईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते.
- एखाद्या कंपनीच्या लेटर हेडची कॉपी करून त्यावर “फेक ऑफर लेटर” बनवून घेऊन ते मेल करण्यात येते. एकदा का व्यक्तीने संबंधित इमेलला उत्तर दिलं की मग हजारो रुपये भरायला सांगून फसवणूक करण्यात येते.
टीप: कुठलीही कंपनी इंटरव्ह्यू शिवाय नोकरी किंवा ट्रेनिंग देत नाही. तसेच ऑफर लेटरही मेल करत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या इमेल्सना उत्तरे देणं टाळा.
- इमेलद्वारे फसवणूक:
- इ-मेलवर रोज शेकडोच्या संख्येने ‘स्पॅम’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलद्वारे चॅटिंग करून फसवणूक केली जाते.
- “अमुक एक रक्कम / क्रेडिट कार्ड/ परदेशी ट्रिप यासाठी तुमचा ईमेल आयडी निवडण्यात आला आहे”, अशा प्रकारच्या ईमेल्सना ‘स्पॅम’मध्ये टाकून द्या. कारण उत्तर दिल्यास तुम्ही त्यांच्या जाळयात अगदी सहज अडकत जाता.
टीप: कुठलीही कंपनी /बँक/ फायनान्शिअल संस्था विनाकारण कोणाला काहीही बक्षीस देत नाही. शक्यतो अशी इमेल्स स्पॅममध्ये आपोआपच टाकली जातात. परंतु शेवटी ती एक यंत्रणा आहे त्यामुळे साहजिकच त्याला मर्यादा असतात. आपण मात्र सावध राहणं आवश्यक आहे. उगाच लोभात अडकून अशा मेल्सना उत्तरे देण्याचं टाळावं.
रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान
आयकर रिफंडचे संशयास्पद इमेल्स आणि करदात्यांची फसवणुक
सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.